marathi blog vishwa

Saturday, 4 November 2023

तेथे कर माझे जुळती...

#सुधा_म्हणे: तेथे कर माझे जुळती...

04 नोव्हेंबर 23 

मराठी भाषेतील कवी आणि लेखकांच्या प्रतिभेचा, शब्दसौंदर्याचा फुलोरा पाहिला की आपण अगदी स्तीमित होऊन जातो. किती सुरेख ती शब्दकळा. असे वाटते मनात एखाद्या कल्पनेचा जन्म होताक्षणी भाषा जणू त्यांच्यापुढे सुरम्य शब्दांचा आपला पेटारा घेऊन उभीच आहे. जे कवी आणि लेखक मला आवडतात त्यामध्ये कविवर्य बा. भ. बोरकर उर्फ बाकीबाब यांचे नाव कायमच पहिल्या दहामध्ये आहे. 

मराठी कोंकणी अशा दोन्ही भाषेवर प्रभुत्व असलेले बाकीबाब. समाजात कवी मंडळींचे कौतुकही होते आणि कुचेष्टा देखील. आपण कवी असल्याचा बोरकरांना सार्थ अभिमान होता. त्याकाळी कुणी त्यांना फोन केला तर त्यावर ते “हॅलो, पोएट बोरकर बोलतोय..” असे अभिमानाने सांगायचे. अत्यंत उत्कट प्रणयरम्य कविता लिहिणारे बोरकर इथल्या जगण्यावर अफाट प्रेम करायचे. भोगापासून त्यागापर्यंत प्रत्येक गोष्ट असोशीने त्यांना हवी असे. इथला निसर्ग, इथली माणसे, आपले जगणे, मनातील भावभावना हे सगळं सगळं त्यांना अतीव प्रिय होते. जन्माला आल्यावर रसरसून जगायला हवे यावर दृढ विश्वास होता. मनात आणि आचार-विचारात अजिबात ढोंगीपणा नव्हता. म्हणूनच एका कवितेत ते म्हणतात,

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा

तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा..

तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा

शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा.. 

त्यांच्या शब्दांची ताकद इतकी की गेली काही दशके नवीन पिढ्या त्यांची कविता मुखोद्गत करतात. त्यातील ओढ, तळमळ आणि जिवंतपण अनुभवताना रोमांचित होऊन जातात. जगात अनेक मोठी माणसे होऊन जातात मात्र सगळ्यानाच प्रसिद्धी लाभत नाही तरीही ते भव्य आणि दिव्य असतात. त्यांना वंदन करताना बाकीबाब “दिव्यत्वाची जेथ प्रचिती.. तेथे कर माझे जुळती..” असे म्हणून जातात. 

या देशासाठी, धर्मासाठी, मानवतेसाठी ज्यानी आयुष्य वेचले त्यांची लोकांनी मात्र फारशी आठवण ठेवली नाही. स्वतः बोरकर देखील स्वातंत्र्यसैनिक होतेच. या कवितेची खोली इतकी की ऐकताना आपण शांत गंभीर होऊन जातो. एखाद्या माळावर असलेल्या वीरांच्या एकाकी समाधीपाशी जेंव्हा आपण उभे असतो तेंव्हा हमखास बोरकरांची ही ओळ आठवतेच..

यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥ ५ ॥

मात्र बोरकर कधी फारसे उदास नसतात. कायम आशावादी असतात. जीवनाची चहू अंगाने पूर्ण अनुभूति घेणारे बोरकर भविष्याबबत कधीच अकारण गळे काढत नाहीत. इथल्या लोकांच्या प्रतिभेपुढे ते नम्र होत राहतात. ज्याना चैतन्याचे वरदान मिळाले आहे अशांचे गुणगान करताना ते म्हणतात,

स्मिते जयांची चैतन्यफुले, शब्द जयांचे नव दीपकळे
कृतीत ज्यांच्या भविष्य उजळे, प्रेम विवेकी जे खुलती ॥ ६ ॥

ज्यांच्या कृतीने अवघ्या विश्वाचे कल्याण होणार आहे त्याचे त्यांना फार कौतुक असे. अशी माणसे आपली जिवलग असायला हवीत. मग आसपास फक्त आनंद दरवळत राहील. कर्तृत्व फुलत राहील. सगळ्याच लोकाना असे जगता आले तर विश्व किती सुंदर होऊन जाईल ना?

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment