#सुधा_म्हणे: त्या फुलांच्या गंधकोषी..
25 नोव्हेंबर 23
कवी सूर्यकांत खांडेकर. मराठी कविता / गीते या क्षेत्रात त्यांना कधीच विसरता येणार नाही अशा काही दर्जेदार रचना देणारे कवी. मूळचे कोल्हापूरचे. त्यांनी कित्येक कविता लिहिल्या आणि काही चित्रपटांसाठी गाणी देखील. “त्या फुलांच्या गंधकोषी..” या एकाच गीताने त्यांना उदंड प्रसिद्धी मिळाली. परमेश्वर आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाही पण जशी हवा दिसत नसूनही आजूबाजूला असल्याचे जाणवते तसेच ईश्वराचे देखील. इथे त्या ईश्वराला कवी किती सुरेख प्रश्न विचारतो आहे.
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस
का ?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज
का...
त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का...
गात वायूच्या स्वरांने सांग तू आहेस का...
दूर दूर असणारे तारे. त्यांचे ते तेज इथे बसूनही आपल्याला जाणवते. हे तेज त्यांना कुणी दिले याचा अभ्यास करत बसलो तर काहीच उमगत नाही. कितीही वैज्ञानिक आले कितीही शोध लागले तरी ताऱ्यांची उत्पत्ति कशी झाली, वाऱ्याचे हवेहवेसे शीतलपण कुठून आले आणि आकाशाचा निळा रंग कसा बनला याची उत्तरे मिळाली तरी हे घडवणारी कुणी शक्ति आहे हीही गोष्ट अधोरेखित झाली.
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का...
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का...
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का...
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का...
जीवनी संजीवनी तू माऊलीचें दूध का ?
कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात
का ?
मूर्त तू मानव्य का रे बालकांचे हास्य
का...
या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का ..
पाऊस कसा पडतो, आकाशात वीज का चमकते, सागराला भरती ओहोटीच्या लाटांचे खेळ का सुरू असतात याचे कितीही शास्त्रीय विश्लेषण आपण केले तरी अमुक एका ठिकाणी या क्षणी पाऊस हवा, या क्षणी वीज हवी असे वाटले तरी आपण चटकन काही करू शकत नाही. इतक्या भव्य दिव्य रूपात जे काही आसपास आपण पाहतो तेच तर ईश्वराचे रूप असे कवीला वाटले नसते तरच नवल. हृदयनाथ मंगेशकर यांनी या गीताला इतकी परिणामकारक चाल दिलीये की त्यांचा तो भावगर्भ आवाज आणि ही कविता ऐकणे हा एक उत्कट अनुभव असतो. कितीही वेळा ऐकले तरी मनाला संतोष देणारे.
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment