#सुधा_म्हणे: 192
रसिका तुझ्यासाठी..
23 नोव्हेंबर 23
कलाकारांचे विश्व वेगळेच. कोणत्याही कलाकारांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते त्यापैकी एक म्हणजे उत्तम गुरु लाभणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कलाकाराची कला समजून घेणारे रसिक लाभणे. कोणतीही कला अंगी बाणवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. काही मोजक्या प्रतिभावान व्यक्तीला कलेची दैवी देणगी जन्मजात मिळते. तरीही त्यांना उत्तम रसिक भेटतील याची खात्री नसते. प्रसिद्धीअभावी, योग्य रसिकापर्यंत कला न पोचण्यामुळे कित्येक जण अज्ञातात गडप होऊन गेले. त्यामुळे कलाकारांसाठी रसिक हा जणू ईश्वर ठरतो म्हणून बालगंधर्वांच्या सारखी थोर व्यक्ती देवा, मायबाप रसिक हो असे म्हणून त्यांच्या पायी माथा टेकवते.
सवाई गंधर्वसारख्या महोत्सवात महाराष्ट्रातील जाणकार रसिकांसमोर कला पेश करायला देशभरातून कलाकार स्वतःहून यायला उत्सुक असतात. याच महोत्सवात काही दशकांपूर्वी थेट आसामची एक मुलगी येऊन मैफिल सादर करते. तिच्या गायनामुळे, तिन्ही सप्तकात फिरणाऱ्या तिच्या आवाजामुळे देशभर तिचे नाव गाजत असतेच. महाराष्ट्रात आल्यावर तिचे शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन यावरील प्रभुत्व पाहून रसिक सुखावलेले असताना ती एक मराठी गीत गाते आणि त्यानंतर वर्षानुवर्षे जेंव्हा जेंव्हा ती पुन्हा येते तेंव्हा हेच गीत तिच्याकडून ऐकायला इथल्या पुढल्या पिढ्यातील रसिक देखील आग्रह करत राहतात. अशी भन्नाट लोकप्रियता लाभलेली ती सुप्रसिद्ध गायिका म्हणजे परवीन सुलताना आणि गंगाधर महांबरे यांनी लिहिलेले ते मराठी गीत होते रसिका तुझ्याच साठी मी एक गीत गाते....! तिलंग या रागावर आधारलेली ही रचना. कुठेही चटकन मिसळून जाणारा असा राग. रसिक आणि कलाकार यांच्यातील नाते जोडून देणाऱ्या गाण्यासाठी किती साजेसा वाटतो ना ?
गीत देखील किती छान आहे. अगदी साधे सोपे, सुरेख शब्द घेऊन सजलेले,
रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते
हृदयांत दाटलेली भावांजली वहाते
आले दुरुनी येथे घेऊन सूर कंठी
जणु विठ्ठलाघरी ये दिंडीच वाळवंटी
रसिकांत देव माझा दिनरात मी पहाते
कलाकारांसाठी त्यांचे गुरु आणि मायबाप रसिक हेच तर त्या विठ्ठलासारखे. त्यांच्यासाठी आपली कला सादर करणे म्हणजे जणू देवपूजाच असते. त्यातले पावित्र्य, त्यातली भावसमाधी शब्दातीत असते. आणि त्याचवेळी अथक रियाजाने लाभलेली कला अधिक परिपूर्ण करण्याचा घेतलेला ध्यास असतो. त्यातूनच आलेल्या आत्मविश्वासामुळे कलाकार जेंव्हा म्हणतो,
माझी फुले सुरांची मधुबोल गंध देती
आलाप छंद घेता निमिषात धुंद होते
बांधोनि भाग्यपूजा मी भाग्यवंत होते
जनमानसांत देवा दिसशी समोर जेव्हा
हृदयात दाटुनी ये आनंदपूर तेव्हा
शतजन्म हेच राहो अपुले अभंग नाते..
त्यावेळी त्या सुरांच्या आलाप – ताना यांच्यात केवळ कलाकार धुंद होत नाही तर त्यासोबत रसिक देखील धुंद होऊन जातात. ती धुंदी अमीट असते. गाण्यात ऐकू येणारे ते षड्ज, रिषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत निषाद केवळ सूर राहत नाहीत तर आपले अवकाश व्यापून टाकतात. त्याला पावित्र्याचा स्पर्श असतो म्हणूनच ते सूर देवस्वरूप होऊन जातात. रसिक आणि कलाकार यातले अद्वैत मग चिरंतन फुलत राहते.!
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment