#सुधा_म्हणे: शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी….
09 नोव्हेंबर 23
श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी यांच्याकडून जी मराठी गाणी गाऊन घेतली त्यातील जास्त गाणी ही वंदनाताईंचीच. “परिकथेतील राजकुमारा..”, “नाते जुळले मनाशी मनाचे..”, अशा सुरेख कविता लिहिणाऱ्या वंदनाताई यांनी “ए आई मला पावसात जाऊ दे..” सारखे कायम लक्षात राहिलेले बालगीत देखील लिहिलेले. कविता, लेखन, चित्रपटातील गाणी, भावगीते, बालनाट्य, बालसाहित्य यामध्ये त्यांनी उदंड काम केले. विनय गोखले, शिवाजी साटम, विनय येडेकर आदि कलाकारांना त्यांच्याच बालनाट्यातून प्रथम संधी मिळाली होती. साध्या सोप्या शब्दातून आशयघन अशा अनेक कविता त्यांनी लिहिल्या. त्यातील “शोधीसी मानवा..” आणि “हे मना आज कोणी बघ तुला..” ही दोन गीते तर अतिशय सुरेख. कधीच विसरता न येणारी अशी. दोन्हीचा अर्थही साधारण एकसारखा. निसर्गातील देवत्व शोधणारा.
विविधतेने नटलेले हे विश्व. इथे सुंदर, सुरम्य गोष्टी आहेत, हळुवार, अलवार नाती आहेत. निसर्गात भरून उरलेले संगीत आहे. मग मनात एकच विचार येतो कुणी बनवले हे जग. कसे बनवले हे जग ? त्या निर्मात्याला कधी आपण निसर्ग म्हणतो, कधी देव म्हणतो तर कधी विधाता. त्याला शोधण्यासाठी मग खूप काही करत राहतो. त्याच्या प्रार्थना म्हणतो, त्याच्यासाठी पूजा करतो त्यासाठी नवनवीन कर्मकांडे बनवतो. अनेक संत महंत सांगून गेलेत की देव कुठे अन्यत्र नाही. आपण सगळीच देवाची लेकरे आहोत. तो आपल्यातच वसलेला आहे. अगदी हेच आपल्या गीतातून सांगतात वंदनाताई विटणकर.
शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी
गंध का हासतो, पाकळी सारुनी ?
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी
भोवताली तुला, साद घाली कुणी
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी..
एखाद्या कळीचे हळुवार फुलत फूल बनते. त्यातून धुंद असा गंध वाऱ्यावर पसरत राहतो. कसे बनते हे सारे? एखाद्या झऱ्याकाठी नुसते शांत बसले तरी मनातील तरंग शांत होतात. चित्तवृत्ती उल्हसित होतात. कुठून मिळते ही संजीवनी? हे सारे तो ईश्वरच तर देत असतो. त्याला शोधायला, पाहायला मग आपण अधिक आतुर होतो.
भेटतो देव का, पूजनी अर्चनी ? पुण्य का लाभते, दानधर्मातुनी ?
शोध रे दिव्यता,
आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा
खेळशी कुठवरी ?
पूजा, अर्चा, उपास, तापास असे किती किती विविध उपाय करत बसतो. पण तो देव इथल्या कर्मकांडात नाही तर अवघ्या चराचरात भरलेला आहे हेच सत्य. आज वसुबारस. गायवासरात देखील ईश्वर आहे यावर विश्वास ठेवणारी, त्यांना जपणारी आपली संस्कृती. ईश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही, तर इथल्या अणूरेणूत आहे. त्याची सूक्ष्मता, त्याची भव्यता, त्याची दिव्यता स्वतःपासून इतरांच्यात आहे हे आपल्याला उमगले पाहिजे. आपल्याला असा देव दिसत राहायला हवा. मग देव शोधत बसण्याची आंधळी कोशिंबीर खेळायची कशाला?
मित्रहो, आजपासून दिवाळीची सुरुवात. तेजाचा, उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. आपले जीवन तेजस्वी व्हावे, आपले आयुष्य स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुखकारक व्हावे. सगळे शोध संपून सर्वाना आपले श्रेयस आणि प्रेयस मिळावे. आपल्याला स्वतःच्या अंतरात्म्यातील आणि इतरांमधील ईश्वर दिसत राहावा हीच प्रार्थना.
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment