marathi blog vishwa

Saturday, 11 November 2023

तू बुद्धी दे.. तू तेज दे..

#सुधा_म्हणे: तू बुद्धी दे.. तू तेज दे..

13 नोव्हेंबर 23 

दीपावली. प्रभू राम अयोध्येत आल्यावर जो आनंदसोहळा साजरा झाला तो हा दिवस. दुष्ट नरकासुराला नष्ट केल्यावर त्याच्या कैदेतील सोळा हजार स्त्रियांची मुक्तता करणाऱ्या श्रीकृष्णाचे स्मरण करणारा हा दिवस. राम असो वा कृष्ण, त्यांच्या काळातील ते महामानव होते. स्वतःचे आयुष्य घडवतानाच त्यांनी इतरांचा विचार केला. त्यांच्या सुखासाठी धडपड केली. दुर्बल, असहाय्य लोकांच्या मदतीला ते धाऊन जात राहिले. म्हणून ते देवत्वाला पोचले. त्यांच्याकडील तेजाचा एक अंश जरी आपल्याला लाभला तरी आपले आयुष्य धन्य होऊन जाईल. अगदी तसेच आहे या गीतातील मागणे;

जाणवाया दुर्बलांचे, दुःख आणि वेदना

तेवत्या राहो सदा, रंध्रातुनी संवेदना

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे...

तू बुद्धी दे.. तू तेज दे..  नवचेतना विश्वास दे

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे...

कितीदा आपण ऐकले असेल हे गाणे. त्यातला अर्थ आपल्या मनात खोलवर उतरतो. आपण घरातील देव्हारा असो वा एखादे मंदिर. तिथे गेलो की आपल्याला जे हवे ती गोष्ट मागतो. कधी धन, कधी नोकरी, कधी यश तर प्रसंगी इतराना त्रास व्हावा अशी देखील मागणी करतात काही मंडळी. त्या सगळ्यापेक्षा हे खूप वेगळे मागणे आहे. इथे कवी गुरु ठाकूर यांच्या विचारांची खोली, व्याप्ती दिसते. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्यावरील चित्रपटातील हे गीत. 


इथे त्यांचे ईश्वराकडे असणारे मागणेदेखील किती भव्य आणि देखणे आहे. ते सामर्थ्य मागतात, तेज मागतात, बुद्धी मागतात. आपली नीती भ्रष्ट होऊ नये अशी मागणी करतात. आपल्या संवेदना जिवंत राहोत म्हणताना सदैव सत्संगती मिळावी यासाठी प्रार्थना करतात. त्यापुढे जाऊन ते म्हणतात,

हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती

सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी

समाजात अशी शेकडो माणसे आहेत जे निराधार आहेत, अशीही माणसे आहेत ज्याना त्यांचा मार्ग सापडत नाही त्या सर्वाना ईश्वराने मदत करावी अशी जगावेगळी ही मागणी. विशाल मनाचे द्योतक असलेली..!

दीपावलीसारख्या मंगल सणाच्यावेळी आपण आनंद साजरा करत असताना इतराना सुख मिळावे यासाठी आपण काहीतरी कृती करत असतोच. समजा काही कृती अशक्य असेल तर किमान इतरांच्या भल्यासाठी अशी प्रार्थना तरी आपण नक्कीच करू शकतो ना?

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment