#सुधा_म्हणे: मन उधाण वाऱ्याचे..
27 नोव्हेंबर 23
जुन्या मराठी चित्रपटातील सुरेख गाण्यांच्या नंतर मधला एक काळ असा गेला की काही सुरेख गाणी कमी ऐकू यायची. मात्र “श्वास”नंतरच्या काळात मराठी चित्रपटाने जणू कात टाकली आणि अतिशय सुंदर असे काही विविध चित्रपट दिले. काही उत्तम विनोदी पटकथा होत्या तर काही गंभीर असे चित्रपट देखील. कित्येक नवे गायक, गीतकार, संगीतकार यावेळी सज्ज झाले आणि त्यांनी उत्तम अशी गीते दिली जी कायम लोकांच्या स्मरणात राहतील. मन ही अशीच एक गोष्ट. आपल्या मनातील स्पंदने अचूक टिपणारे एक सुंदर गीत गुरु ठाकूर यांनी लिहिले आणि अजय अतुल त्याला उत्तम स्वरसाज चढवला. शंकर महादेवन हे स्वतः गुणी गायक आणि संगीतकार असे व्यक्तिमत्व. त्यांच्या आवाजात जेंव्हा कानावर पुढील या ओळी पडतात तेंव्हा आपली पाऊले थबकल्याविना राहत नाहीत...
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते
माणसाचे मन ही अतर्क्य अशी गोष्ट. कितीतरी उत्तम कल्पना मनात साकारतात आणि मग प्रत्यक्षात येतात. नवीन स्वप्ने, नवीन नाती मनात फुलतात आणि मन त्यात धुंद होऊन जाते. ती स्वप्ने साकार करायला धडपडत राहते. कधी पडतो, अपयशी होतो पण पुन्हा उठून स्वप्न पूर्ण करायला सिद्ध होतो. जेंव्हा हवेसे सारे काही मिळते तेंव्हा लाभलेल्या सुखाची अनुभूति शब्दात कशी सांगता येणार ?
मनातून असे सतत नवे स्वप्न निर्माण झाले नसते तर कदाचित आपण माणसे आळशी होऊन गेलो असतो ना? गुरु ठाकूर असेच काहीसे म्हणतात,
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते
?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
आपल्या आयुष्यात अनेक दुःखे, कष्ट असले तरी आपले छंद, आपल्या आवडीनिवडी आणि हवीशी असणारी जिवलग माणसे आपल्याला जगायला बळ देतात. त्यांच्या साथीने गुणगुणत जगणे सुंदर होऊन जाते. जन्माला आल्यावर उत्तम आयुष्य जगणे यापेक्षा आपल्याला तरी दुसरे काय हवे असते ?
सगळ्यांच्या आयुष्यातील दुःखे कमीतकमी व्हावीत, प्रत्येकाने गाणी गुणगुणत आनंदाने जगावे, फुले पहावीत, स्वच्छ वाहते पाणी पहावे, सुंदर असे सूर्योदय सूर्यास्त पाहवेत, चंद्रतारे पाहावेत आणि आपल्या जिवलग व्यक्तींच्या सोबतीने आयुष्याची वाट चालत राहावी इतुकेच देणे सर्वाना द्यावे असेच मागणे मग ईश्वराकडे मागावेसे वाटते..!
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment