#सुधा_म्हणे : विश्रब्ध मनाच्या कातरवेळी..
24 नोव्हेंबर 23
कवी ग्रेस यांच्याविषयी जसे एक गूढ बनून राहिले आहे तसेच काहीसे घडले आरती प्रभू यांच्याविषयी देखील. तळकोकणात एका खानावळीत बसून “सत्यकथे” सारख्या विविध मासिकात कविता, लेख पाठवणारे चिं. त्र्य. खानोलकर उर्फ आरती प्रभू मराठी साहित्यविश्वात एखाद्या धूमकेतूसारखे अवतरले. त्यांच्या शब्दाची जादू वेगळीच. रात्र काळी घागर काळी, कोंडूरा, अजगर, गणुराया आणि चानी आदि कादंबऱ्या जशा गाजल्या तसेच एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, कालाय तस्मै नम: आदि नाटके देखील. त्याच्या संहित्यकृतींवर आधारित चित्रपट देखील निघाले. अवघे साहित्यविश्व त्यांच्यामुळे एकदम झगमगू लागले. या संगळ्यापेक्षा वर होत्या त्यांच्या कविता.
गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, ये रे घना, समईच्या शुभ्र कळ्या आदि कवितांची जी भुरळ लोकाना पडली आहे ती काही पिढ्या संपून गेल्या तरीही संपत नाही. किती ते अलवार शब्द आणि केवढा तो त्यातील आशय.
वैयक्तिक आयुष्यात विविध गोष्टींशी झगडणाऱ्या आरती प्रभू यांच्या कविता, कादंबऱ्या आणि नाटकाने लोकांवर गारुड केले. आज ज्या गीतावर बोलावेसे वाटते ती कविता म्हणजे विश्रब्ध मनाच्या कातरवेळी.. म्हटले तर गद्य भासणारे हे काव्य सुरांच्या साथीने फार वेगळे भासू लागते.
विश्रब्ध मनाच्या कातरवेळी ,
एखाद्या प्राणाची दिवेलागण
सरत्या नभाची सूर्यास्तछाया,
एखाद्या प्राणात बुडून पूर्ण..
त्याला आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केले आहे. अत्यंत प्रतिभावान अशा या संगीतकाराने त्यांच्या शब्दातील खोल भावना सुरांच्या माध्यमातून अतिशय गंभीरपणे समोर आणली. उत्तरा केळकर यांच्या आवाजात ऐकताना आपण एका वेगळ्याच विश्वात जातो असे मला वाटते.
गीतात न्हालेल्या निर्मळ ओठा
प्राजक्त चुंबन एखादा प्राण
तुडुंब जन्मांचे साचलेपण,
एखाद्या प्राणाची मल्हारधून,
एखाद्या प्राणाचे सनईसूर
आपल्या आयुष्यात आलेली माणसे आपल्या आयुष्यात विशिष्ट ठसा उमटवून जातात. त्यातील काही जिवलग माणसे कलाकाराच्या प्रतिभेमुळे मग त्याच्या साहित्यात दिसत राहतात. त्यांचे ते दर्शन फार लोभसवाणे असते. अशा साहित्यकृती मग आपल्या मनाला भिडत राहिल्या नाहीत तरच नवल..!
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment