#सुधा_म्हणे: पक्ष्यांचे लक्ष थवे..
21 नोव्हेंबर 23
निसर्ग कवी ना. धों. महानोर. मराठी साहित्यात
ज्यांच्या कवितेत निसर्ग येतो त्यात बालकवी आणि बाकीबाब बोरकर यांचा नंबर आधी
असतोच त्यानंतर अर्थातच पुढला नंबर
महानोर यांचा असतो. एकेकाळी जशी गुलजार, जावेद अख्तर यांना लोकप्रियता होती, वलय
होते तसे वलय महानोर यांना कायमच लाभलेले. बोरकरांच्या कवितेत
रंगवलेला निसर्ग मानवाच्या हळव्या उत्कट
भावना सोबत घेऊन येतो. तरीही त्यांची कविता कायम शालीन, कुलीन वाटते. महानोर
यांची कविता मात्र एखाद्या सामान्य शेतकरी माणसाच्या रूपात येते. त्यातली सुख दुःख, शृंगार, विरह, प्रीती भक्ती या सगळ्याला मातीचा एक रसरशीत
रांगडा स्पर्श असल्यासारखी ही कविता. आणि पुन्हा ती कधीही बीभत्स न झालेली.
त्यांच्या अनेक कविता गाजल्या यात नवल ते काय. जैत रे जैत सारख्या विविध चित्रपटातील गीतांनी त्यांना उदंड लोकप्रियता मिळाली. राजकारणासह विविध क्षेत्रात त्यांचा वावर असला तरी हाडाचे शेतकरीपण त्यांनी कायम जपले. त्या “काळ्या आई”सोबत त्यांचे खरे नाते. जीवाभावाचे. म्हणूनच एका कवितेत ते म्हणतात;
मी माझ्या मुलुखात नांदतो ऐश्वर्याचा राजा,
इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा...
खरोखर त्यांनी आपल्या साहित्यातून चैतन्याच्या बागा
फुलवल्या. मानवी भावना ज्या तीव्रतेने त्यांच्या कवितेत,
गीतात येतात तशी कितीतरी गीते आपण सांगू शकतो. मात्र मला आवडणारी त्यांची कविता ही
गगनाला कवेत घेणारी अशी विशालहृदयी आहे. ते म्हणतात,
पक्ष्यांचे लक्ष थवे गगनाला पंख नवे
तेजोमय विश्वाचे, ओठावर गीत हवे..
ओठावर गीत घेऊन झाडातून हिंडताना त्यांना ओढ असते ती घनाच्या चिंब वर्षावाची. महानोर यांच्या कवितेतील हा पाऊस फार अलवारपणे येतो. पहा ना किती नाजूक देखण्या शब्दात रंगत जाते ही कविता;
वाऱ्यावर गंधभार भरलेले ओचे
झाडातून लदबडले बहर कांचनाचे
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे..
सोन्याची अंबारी, सोन्याचे इन्द्रधनू
धरतीवर मृदुल पाय उतरले कुणाचे..
महानोर असे काही लिहून गेलेत की शब्दांची हवीहवीशी कट्यार जणू काळजात आरपार जात राहते. दुखवण्याऐवजी सुखावत राहते. बोरकरांसारखी, महानोरांसारखी माणसे म्हणूनच आपल्यात नसली तरी कायमच जिवलग भासत राहतात. त्यांच्याच शब्दात पुनःपुन्हा नव्याने भेटत राहतात असे मला वाटते. तुम्हाला काय वाटतं?
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment