marathi blog vishwa

Tuesday, 7 November 2023

दोन घडीचा डाव..याला जीवन ऐसे नाव..

#सुधा_म्हणे: दोन घडीचा डाव..

07 नोव्हेंबर 23 

जन्म आणि मृत्यूच्या दोन शाश्वत गोष्टींच्या मध्ये असलेले आपले आयुष्य म्हणजे जणू विधात्याच्या हातातील कठपुतळीचा खेळ. आपल्या हाती काही नसते असे म्हणतो. सतत विविध गोष्टीसाठी धावताना, कष्ट करताना हे आयुष्यदेखील पाहता पहाता संपून जाते. मनासारखी सोबत मिळाली तर मात्र हे आयुष्य सुखद होऊन जाते. प्रत्येक क्षण आनंददायी होऊन जातो.


शांताराम आठवले यांनी रामशास्त्री या मराठी चित्रपटासाठी 1940 च्या दशकात लिहिलेले “दोन घडीचा डाव.. याला जीवन ऐसे नाव..” हे गाणे असेच तत्वज्ञान मांडणारे. न्यायाधीश कसा हवा तर रामशास्त्री यांच्यासारखा निस्पृह हवा असे आपण म्हणतो. त्यांच्यावर निर्माण झालेल्या चित्रपटातील हे गाणे केशवराव भोळे यांच्यासारख्या कसदार संगीतकाराने संगीतबद्ध केलेले. या गाण्यात प्रयोग करताना मंजू आणि अनंत मराठे या गायक मुलांना त्यांनी गाणे गायला लावले. चित्रपटातील क्षण असा की रामची लहानगी पत्नी तो येण्यापूर्वी सागरगोटे खेळत आहे आणि बडबडगीत गावे तसे गाणे गात आहे.

हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की आपण ही ओळ सुभाषितासारखी आजतागायत वापरतो आहोत. साधी सुटसुटीत चाल, तिच्या हातातील सागरगोटे झेलण्याच्या क्षणाशी मिळणाऱ्या ठेक्यावर सतार आणि तबल्याचे बोल आणि तिला साथ द्यायला मग अचानक रामचे तिथे येणे.. मग दोघांनी मिळून गाणे पुढे प्रसन्नपणे गात राहणे. गाण्याचे शब्द हे भले लहान मुलांच्या तोंडी असले तरी मोजक्या शब्दात व्यक्त केलेले बोल खूप काही सांगून जातात. आठवले लिहितात, 

माळ यशाची हासत घालू

हासत हासत तसेच झेलू

अपयशाचे घाव.. याला जीवन ऐसे नाव..  

प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी तर व्हायचे असतेच. यश मिळाल्याने माजू नये आणि अपयश आले तर निराश होऊ नये. हसत हसत त्याला सामोरे जाणे आपल्याला जमायला हवे. उत्तम जगण्यासाठी हेच तर असायला हवे ना?

आयुष्यात येणारी सुखे- दुःखे आपण सहज पार करू शकतो, अडचणींवर मात करू शकतो जर आपल्या सोबत योग्य व्यक्ती असेल तरच. आयुष्य हे जणू खेळांसारखे. कधी जय कधी पराजय, कधी आनंद कधी दुःख हे सगळे असणारच. मात्र जिवलगाची मनासारखी सोबत असेल तर प्रत्येक क्षण सोनेरी आणि सुगंधी होऊन जातो. ती संगत एकमेकाना फुलवते. नवनवीन कामे करायला सहाय्यभूत ठरते. नेमके हेच सांगताना आठवले म्हणतात,

मनासारखा मिळे सवंगडी,

खेळाला मग अवीट गोडी

दुःखाला नच वाव.. याला जीवन ऐसे नाव.. 

प्रत्येकाला आयुष्यात केवळ सुख हवेच असते. मात्र खूप दुःख भोगायची ताकद जिवलगामुळे मिळते. पडद्यावर लहान मुलांनी रंगवलेले हे गीत प्रत्यक्षात आपल्याला विचार करायला भाग पाडते. प्रत्येकाला असा साथी मिळू दे अशीच भावना मनभर भरून राहते.

-सुधांशु नाईक(9833299791)


No comments:

Post a Comment