#सुधा_म्हणे: एक धागा सुखाचा..
08 नोव्हेंबर 23
आपले आयुष्य किती गुंतागुंतीचे असते ना. त्यात पुन्हा पुढला क्षण कोणता याबद्दल आपल्याला अजिबात काहीच माहिती नसते. तरीही आपण किती किती गोष्टी ठरवतो. त्यासाठी धावत राहतो. सुखाच्या एका क्षणासाठी दुःखाचे शंभर क्षण सोसत राहतो. तो सुखाचा क्षण अनुभवला की पुन्हा दुसरा क्षण हवा असतोच आपल्याला. सुख आणि दुःखाच्या या खेळात कधी वर्षानुवर्षे संपून जातात ते कळतच नाही. बालपणीची सुखे वेगळी, तारुण्यातील सुखे वेगळी आणि वृद्धापकाळी हवी असणारी सुखे वेगळी. त्या त्या वेळी आपल्या मनोभूमिका, आपले मनोविचार आणि भावभावना किती वेगवेगळ्या असतात. हे जर असे नसते तर आपले आयुष्य फार एकसुरी झाले असते ना ?
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून आपण ज्याना कायमच आठवतो त्या गदिमांच्या दैवी प्रतिभेतून असेच काहीसे सांगणारे गाणे निर्माण झाले. राजा परांजपे, सुधीर फडके आणि गदिमा यांनी गाजवलेल्या जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे गाणे. आपल्याकडे चित्रपट संगीत हे फक्त करमणुकीचे साधन नसते तर त्यात मानवी जीवनाच्या सगळ्या बाजू आपल्याला दिसत राहतात. या गीतातून देखील असेच शाश्वत सत्य समोर येते. गदिमांच्या सारख्या प्रतिभावान कवीच्या शब्दांचे सौन्दर्य पहात राहावे असेच. ते लिहितात,
एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा
तुझिया आयुष्याचे..
मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने
तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी
लेणे वार्धक्याचे
लहानपणी काही कळत नसते. तहान, भूक आदि प्राथमिक
गरजांच्या पूर्ततेसाठी मनुष्य धावतो. तारुण्यात रंगीबेरंगी आयुष्य समोर येते. तारुण्य
चहू अंगाने अनुभवताना वार्धक्य कधी समोर उभे राहते ते कळत नाही. या सगळ्या
प्रवासात कितीजण आपल्या सोबत येतात. आयुष्य चहू अंगाने आपण भोगत राहतो. सुख आणि
दुःख अनुभवत राहतो. पुन्हा हे सगळे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे घडत असते. एकाची
कथा दुसरीसारखी नसते. हे सगळे घडते कसे असे आपल्या मनात उठणारे प्रश्न कवीला
देखील पडले नसते ते नवल. म्हणूनच या भावना त्यांच्या लेखणीतून जशा प्रगट होतात ते
पाहणे मनोरम आहे.
या वस्त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात
त्या हात विणकर्याचे..
सुख आणि दुःखाच्या पलीकडे असलेल्या त्या ईश्वराचे अस्तित्व तर आपल्याला अनेकदा जाणवते मात्र तो दिसून येत नाही ही गोष्ट गदिमा किती सहज सांगून जातात. बाबूजींच्या शांत सात्विक स्वरात हे गाणे ऐकणे हा एक अवीट अनुभव आहे.
आयुष्यात असलेले सुख साजरे करण्यासाठीचा उत्साह आणि दुःख सोसण्याची ताकद मात्र जिवलगाची सोबत देत असते. त्यामुळे दुःखाचे शंभर धागे कधी संपून जातात ते कळतच नाही. प्रत्येक धागा मग सुखाचा वाटू लागतो. आपल्या हाती हव्याशा व्यक्तीचा हात असणे हेच किती भाग्याचे आहे ना?
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment