18 नोव्हेंबर 23
मुक्त स्वच्छंद माणूस जेंव्हा सगळी ओझी उतरवून निर्मळ आनंदाच्या एखाद्या वाटेवर चालू लागतो ती वाट आपल्याला कुठे घेऊन जात असेल, ते मुक्कामाचे ठिकाण कसे असेल ? ज्येष्ठ गीतकार अशोकजी परांजपे यांना दिसलेली ही मुक्कामाची जागा जणू माझ्याही स्वप्नातील जागा आहे.
अशोकजीना जणू सरस्वतीचे वरदान. कसे त्यांचे ते नेमके शब्द. ठाई ठाई उचंबळून येणाऱ्या त्या हळूवार भावना. त्यामुळेच तर त्यांची गीते इतरांपेक्षा कायमच वेगळी भासतात. या गाण्याची सुरुवातच इतकी सुरेख होते की पहिल्या शब्दापासून मन पूर्ण गुंतून जाते;
वाट इथे स्वप्नातील संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू..
आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनात बैसली गं मंत्रमुग्ध राई
फुलुनिया आली गडे बावरी तनू..
या वाटेवरून गेल्यावर ती एक अशी जागा येते जिथे आभाळाच्या अथांग निळाईला शेजारील वनराईच्या हिरवाईचे सख्य लाभले आहे. आपल्याला प्रत्येकालाच एक शांत निळाईची ओढ असते. मनातील तरंगांना आपोआप कवेत घेणारी ही निळाई. तसेच डोळ्याना नको असतो रखरखाट. हिरवाई पाहून मन हरखून जाते. या निळाई आणि हिरवाईच्या खेळात आपण मात्र मंत्रमुग्ध होऊन जातो.! हे सारे सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल आवाजाचे कोंदण घेऊन उमटत राहते आणि मन पिसासारखे हलके हलके होऊन जाते.. निसर्ग आणि मनाशी अतूट जोडली जाणारी ही रचना सगळ्यांसाठी प्रिय होणे अपरिहार्य ठरते.
आणि मग;
दर्यांतूनी आनंदला पाणओघ नाचरा
आसमंत भारितो गं गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले गं इंद्राचे धनू..
अवघे विश्व आनंदस्वर गात राहते. तरल मनात सुखद भाव-भावनांचे इन्द्रधनू उमटते आणि जिवलगाची सोबत घेऊन फुलणारे आपले जगणेच जणू गाणे व्हावे असे वाटत राहते. अशा ठिकाणी घेऊन जाणारी ती वाट, ते लोभस हिरवे निळे विश्व या सगळ्याचे आपण ऋणी होऊन जातो.
-सुधांशु नाईक(9833299791)🌿
No comments:
Post a Comment