#सुधा_म्हणे: या जन्मावर या जगण्यावर..
03 नोव्हेंबर 23
मित्रहो, आध्यात्मिक क्षेत्रात असे मानले जाते की आपल्याला मनुष्यजन्म अतिशय मुश्किलीने मिळतो. आणि या जन्मात काही चांगले काम केले तर आपल्याला मुक्ती मिळते. चौर्यांशी लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्ती. पुन्हा जन्म नाही. मृत्यूनंतरचे जग कुणी पाहिले आहे? एकदा हा देह संपला की आपली माती झाली हेच खरे. त्यामुळे जेंव्हा आपल्याला आयुष्य लाभले आहे तेंव्हा असे काही उत्कट जगून घ्यावे की आपले आणि इतरांचे आयुष्य आनंदी व्हावे. जेंव्हा आपण असे जगतो तेंव्हा आपोआप ओठावर मग गाणे येते,
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
जीवन सुंदर आहे तसेच वाईटदेखील आहे. आपण जसे बघू तसे जग दिसते आपल्याला. एखाद्या गावात गेल्यावर तिथे अस्ताव्यस्त टाकलेला कचरा जसा आपल्याला दिसू शकतो तसेच लोकांच्या दारी फुललेल्या फुलबागा सुद्धा. आपल्याला फुलबाग दिसायला हवी आणि जास्तीत जास्त लोकानी बाग फुलवावी, ही जग सुंदर करावे यासाठी कृतीदेखील करायला हवी.
ही दुनिया खरंच खूप सुंदर आहे. किती प्रकारची झाडे, किती फुले, फळे, किती नद्या, किती सरोवरे, किती समुद्रकिनारे, कसे भव्य दिव्य पर्वत, कशी अफाट जंगले.. किती प्रकारचे पशू पक्षी.. सगळे पाहू गेले तर एकच नव्हे तर हजार जन्मदेखील कमी पडावेत. त्यात हे सारे सारे पाहायला आपल्यासोबत आपली जिवलग व्यक्ती असणे किती आनंददायी असते ना ?
कवि मंगेश पाडगावकर हीच भावना या काव्यात किती प्रभावीपणे मांडतात पहा, संगीतकार यशवंत देव आणि गायक अरुण दाते यांच्या परिसस्पर्शाने या कवितेचे अजरामर गाणे झाले..
चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही
रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे
हळवे ओठ स्मरावे...
रंगांचा उघडुनिया पंखा सांज
कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती
नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे,
येथे भान हरावे...
एखाद्या संध्याकाळी जेंव्हा आकाशात रंगांच्या विविध छटांची उधळण होते तेंव्हा आपण जणू थक्क होऊन जातो. स्तीमित होऊन जातो. इथला प्रत्येक दिवस नवनवे रंग घेऊन येतो. इथले सूर्योदय ही सुंदर आणि सूर्यास्तही सुंदर. इथली पहाटदेखील सुंदर आणि अगणित नक्षत्रांनी भरलेली रात्र देखील देखणी.
या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही
माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी
इथल्या जगण्यासाठी..
असे जेंव्हा पाडगावकर म्हणतात तेंव्हा ते आपल्याच मनातील विचारांचे त्यांच्या शब्दात उमटलेले जणू एक मनोहर प्रतिबिंब असते. आपल्या कृतीने आपले आणि इतरांचे जगणे असे सुंदर करता यावे की लाखों लोकांच्या ओठात हेच गाणे पुनःपुन्हा येत राहावे असे मला वाटते.
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment