marathi blog vishwa

Wednesday 22 November 2023

गगन सदन तेजोमय....

#सुधा_म्हणे: गगन सदन तेजोमय....

22 नोव्हेंबर 23

प्रार्थना. आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक. या विश्वाचे रहस्य आज काही प्रमाणात आपल्याला उलगडले असे वाटते. तरी अचानक काहीतरी घडते आणि मग जाणवते की आपण किती खुजे आहोत. किती गोष्टी आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहेत. आज इतके प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान असताना आपली ही अवस्था असते, तर आदिमानव काळापासून मानवाला किती प्रश्न पडले असतील. ऊन, वारा, पाऊस, वादळ, वन्य प्राणी यांच्याशी झुंजताना किती वेळा तरी त्याने ईश्वराची प्रार्थना केली असेल. त्यातूनच उषा सूक्त, पर्जन्य सूक्त, सूर्यासाठी सौर सूक्त आदि रचना आणि वेदादी साहित्याची निर्मिती झाली. आपण कितीही बलवान बनलो तरी कोणत्या तरी एका शक्तीपुढे आपण नतमस्तक होऊन जातो. लेखक कवीची प्रतिभा, शब्दसामर्थ्य  जितके सुरेख तितके ते साहित्य अधिकाधिक भव्य आणि लोकप्रिय होत जाते.

शब्दांचे अफाट सामर्थ्य असलेले कविवर्य वसंत बापट हे असेच एक व्यक्तिमत्व. “मनात पूजीन रायगडा..” सारखी त्यांची रचना जशी अजरामर झाली तसेच हे गाणे देखील. उंबरठा या चित्रपटात असलेले हे गाणे केवळ चित्रपट गीत उरले नाही तर एक सुंदर प्रार्थना बनली. अनेक कार्यक्रमात, शाळेतून म्हटली जाऊ लागली.

गगनसदन तेजोमय .. तिमिर हरून करुणाकर

दे प्रकाश देई अभय..

छाया तव, माया तव, हेच परम पुण्यधाम

वार्‍यातून तार्‍यांतुन, वाचले तुझेच नाम

जग जीवन, जनन, मरण, हे तुझेच रूप सदय..

आपण अनेक प्रतिमांमधून ईश्वराला पूजत असलो तरी तो तर चराचरात भरलेला आहे हे सांगताना बापट यांनी अचूक शब्दांचा सुरेख वापर केला आहे. वारा असो, तारे असोत, फुले, पाने सगळ्यातून त्याचे प्रसन्न असणे जाणवत राहते. आपल्यावर कायम त्याच्या प्रेमाची छाया भरून राहते. तो कुणी दूर दूर असलेला अनामिक उरत नाही तर आपल्या जीवीचा जिवलग भासू लागतो.

भवमोचन हे लोचन, तुजसाठी दोन दिवे

कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे

सकलशरण मनमोहन, सृजन तूच, तूच विलय..

अशा प्रेमरूप ईश्वराला आपण काय देऊ शकतो ? आणि त्याला तरी कुठे आपल्याकडून काही हवे असते? आपणच उगाच नवस वगैरे करत बसतो. मनापासून मारलेली एक हाक, मनापासून केलेले स्मरण इतकेदेखील त्या ईश्वराला पुरेसे असते. सृष्टीचा निर्माताही तोच आणि आपल्या सगळ्याना शेवटी पुन्हा स्वतःमध्ये सामावून घेणारा देखील तोच. त्याचे हे गगनविशाल रूप या मधुर शब्दातून साकार होत राहते. तो ईश्वर प्रसन्न आणि आपलासा वाटत राहतो. असा जिवलग लाभल्यावर मग मनात कशाला संदेह उरतील ना ?

या प्रार्थनेला संगीत देताना हृदयनाथ मंगेशकर यांनी तिलककामोद हा सुरेख राग वापरला आहे. रागाच्या त्या स्वरावली लतादीदीच्या कंठातून उलगडत जेंव्हा आपल्या मनापर्यंत पोचतात तेंव्हा एका प्रगाढ शांततेने मनाचा गाभारा भरून जातो. अवघे विश्व सुंदर भासू लागते.

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment