marathi blog vishwa

Saturday, 11 November 2023

तेजोनिधी लोहगोल...

#सुधा_म्हणे: तेजोनिधी लोहगोल..

15 नोव्हेंबर 23

दीपावली. हा सण तेजाचा. पराक्रमाने निर्माण केलेल्या नव्या धन-धान्याचे ऐश्वर्य धारण करण्याचा. याच काळात  बलिप्रतिपदा. पराक्रमी भावाकडून बहिणीला प्रेम देणारी भाऊबीज देखील. नव्या विक्रम शकाचा प्रारंभ होतो. देशात आपल्या शालिवाहन शक जास्त करून दक्षिणेत, महाराष्ट्रात वापरले जाते तर विक्रम संवत उत्तरेतील राज्यांमध्ये. नवीन वर्षात यश, कीर्ती, लक्ष्मी या साऱ्याचे वरदान मिळावे म्हणून मग ईश्वराची प्रार्थना केली जाते. त्याची कोटी कोटी रुपे. किती किती नावे. तरीही तेजोमय सूर्य आपल्याला लाभणे ही अतिशय महत्वाची गोष्ट. अवघ्या सृष्टीचे जीवन त्या तेजोनिधी सूर्यावर अवलंबून. त्यामुळे ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर “तेजोनिधी लोहगोल..” असे लिहून जातात तेंव्हा ते अगदी मनाला भिडतेच. 

कट्यार काळजात घुसली या नाटकातले ललत पंचम रागात गुंफलेले हे पद.  पं. वसंतराव देशपांडे यांच्या लखलखीत स्वरातले हे पद आपल्याला सगळे दुःख, सगळ्या चिंता विसरायला भाग पाडते. कानातून अंतरंगात उतरणारे ललत पंचमचे स्वर एकीकडे रोमरोमात भिनत जातात आणि त्याचवेळी समोर क्षितिजावर झरझर वर येणारे ते सोनेरी तांबूस रविबिंब..! एखाद्या निर्जन डोंगर माथ्यावर शांत बसून हे पद ऐकत ऐकत असा सूर्योदय पाहण्यातील सुख शब्दात कसं सांगायचं?

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज

दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज

हे दिनमणी व्योमराज, भास्कर हे गगनराज

ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा

दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा

होवो जीवन विकास वसुधेची राख लाज..

सूर्याची ते अवघ्या विश्वाला जीवनदायी असे  तेजोमय, ज्योतिर्मय दर्शन आपल्याला विस्मयचकित करते. केवढ्या त्या मोठ्या मोठ्या आकाशगंगा. किती ग्रहतारे. लाखों योजने दूर असूनही एका अगम्य बंधनाने एकमेकांशी जोडले गेलेले विश्व. आणि त्या विश्वातील एक लहानसा अणू म्हणजे आपले जीवन. दुरवरून उजेड देत आपला अंधार दूर करणारे ते सूर्यबिंब. प्रसंगी अंगाचा दाह करणारे ते तेज या विश्वासाठी तरीही संजीवक असतेच. तो संजीवक सूर्य त्याचे तेज आपल्या शरीरभर पसरवत राहतो आणि त्या तेजापुढे, त्या स्वरांपुढे आपले हात नकळत जोडले जातात. भरून उरते मग केवळ शांतता आणि सुरू असलेला पक्षांचा किलबिलाट. एक सकाळ अविस्मरणीय होऊन जाते..!

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment