#सुधा_म्हणे: माझ्या मराठी मातीचा ....
06 नोव्हेंबर 23
कवी कुसुमाग्रज यांच्या शेकडो कविता मराठी माणसाने डोक्यावर घेतल्या. त्यांच्या शब्दांवर अपार प्रेम केले. या महाराष्ट्राची भूमीच वेगळी. साधे आयुष्य जगणारी इथली माणसे प्रसंगी देव-देश-धर्मासाठी हाती शस्त्र धरायला कधीच कचरली नाहीत. इथल्या प्रेमिकांनी हळवी गाणी म्हटली आणि वेळ आली तेंव्हा हसतहसत प्राणांचे बलिदान करून मोकळे झाले. ऊन वारा, पाऊस अशा निसर्गाच्या खेळांपुढे सहज छाती काढून चालत राहिले. आलेल्या प्रतिकूलतेवर मात करत राहिले. इथल्या मातीचे गुणच असे की दिवसरात्र घोडदौड करणारे वीर हातावर कणसे खात जीवावरच्या लढाया खेळत राहिले. इथली माती अशी सुपीक की केलेल्या कष्टाचे चीज व्हावे.
स्वातंत्र्य ही गोष्ट तर इथल्या मातीच्या कणाकणात रुजलेली. शिवछत्रपतींसारख्या तेजस्वी राजांपासून कित्येक दशके इथे स्वातंत्र्याची ओढ, जिद्द अखंड धगधगत राहिली. त्यामुळे अशा या मातीवर लिहिताना कुसुमाग्रजांची लेखणी अजिबात थकत नाही. “माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा..” ही कविता लिहिताना म्हणूनच कुसुमाग्रज भारावून जातात.
माझ्या मराठी
मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या
संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील
शिळा
हिच्या कुशीत
जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या
दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात...
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या
गगनांत घुमे, आद्य
स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही...
एकेकाळी देशाला सतत आघाडीवर ठेवण्यासाठी, सगळी आव्हाने आपल्या छातीवर पेलण्यासाठी मराठी माणूस कायम आघाडीवर राहिला. अख्खे मोगल साम्राज्य जसे मराठी गादीसमोर झुकले तसेच ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणणाऱ्या क्रांतिकारकांत देखील मराठी वीर आघाडीवर राहिले. सगळ्या आमिषाना दूर सारत प्रसंगी मृत्यूला कवटाळणाऱ्या तेजस्वी शंभूराजांचे आदर्श घेऊन आपण जगत राहिलो. ते सांगताना कुसुमाग्रज किती परिणामकारक लिहून गेलेत ना ? त्यापुढे जाऊन आपल्या मराठी मातीचा आदर आपण ठेवायला हवा असे ठामपणे सांगताना ते म्हणतात,
माझ्या मराठी
मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून
थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित
अभंग, ओवी अमृताची सखी
चारी
वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
असे आपल्या कवितेत या मराठी
मातीला किती गौरवाने पहावे असे जेंव्हा कुसुमाग्रज म्हणतात तेंव्हा आपलीही छाती
अभिमानाने फुलून येणे साहजिकच आहे ना ?
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment