#सुधा_म्हणे: प्रभू तू दयाळू कृपावंत दाता..
02 नोव्हेंबर 23
महंमद रफी. भारतीय चित्रपटसंगीतातील एक अविस्मरणीय नाव. राफीसाहेबांनी हजारो
गीतांना आपला स्वर्गीय आवाज देऊन अजरामर केले. ज्येष्ठ मराठी संगीतकार श्रीकांत
ठाकरे यांच्यामुळे रफीसाहेबांनी काही मराठी गाणी गायली जी अतिशय लोकप्रिय होऊन
गेली. श्रीकांत ठाकरे ही अतिशय उमदे आणि देखणे आणि अष्टपैलू कलाकार. जितके उत्तम
लिहायचे तितकीच सुरेख संगीत रचना करायचे. उत्तम वादक, संगीतकार, चित्रकार,
पत्रकार, उर्दू अभ्यासक, होमिओपॅथीचे जाणकार असे श्रीकांत जी. त्यांच्यामुळे
कित्येक सुंदर कवितांची गाणी झाली ही आपल्याला मान्य करायला हवेच. वंदना विटणकर, कवि उमाकांत काणेकर यांच्या कित्येक
सुंदर कविताना त्यांनी असे काही स्वरबद्ध केले की आजही त्या संगीतरचना आपण विसरू
शकत नाही. कवि उमाकांत काणेकर यांचे ही असेच एक गाजलेले गाणे.
ईश्वर हा सर्वशक्तिमान असला तरी तो तितकाच दयाळू आहे. आपण त्याला नारळ, फळे, पाच पन्नास रुपयांचे नवस बोलून अगदी आपल्याइतका सामान्य करून टाकतो. पण तो तसा नाहीये. त्याने आपल्याला हात पाय आणि बुद्धी दिली आहे. तरीही जेंव्हा आपण गोंधळून जातो तेंव्हा त्याच्याच पायाशी जावेसे वाटते. ही सांगताना कवि म्हणतो,
प्रभू तू
दयाळू कृपावंत दाता,
दया मागतो रे
तुझी मी अनंता..
जागविण्यास
देहा दिली एक रोटी
नमस्कार माझे तुला कोटी
कोटी
वासना कशाची नसे
अन्य चित्ता..
आयुष्य जगायला त्याने सगळेच दिले
आहे. दोन वेळची भाकरी मिळते आहे. आता काही कसलेच मागणे नाही अशी ही अवस्था. आपण
सर्वसामान्य लोकाना किती काही मिळाले तरी नवीन काही हवेच असते. आपल्या गरजा संपत
नाहीत. मात्र जेंव्हा माणूस असा शांत समाधानी होतो. सगळे भोग संपतात.
तुझ्या
पावलांशी लाभता निवारा
निघे शीण
सारा, मिळे प्रेमधारा...
त्याचे प्रेम, कृपा प्रसाद लाभला
की माणसे तृप्त होऊन जातात. आशा,अपेक्षा यांच्या पलीकडे निघून जातात. त्यांच्या
आयुष्यात ईश्वरभक्तीची पहाट फुलते. कित्येकाना मोठे तत्वज्ञान कळत नाही. मात्र
त्यांची भोळीभाबडी भक्ति जास्त तीव्र असते. ते मग म्हणू लागतात,
ज्ञान काय
ठावे, मला पामराला,
मनी शुद्ध
माझ्या असे भावभोळा..
अशी भावनेने भारलेली, शांत
सात्विक माणसे मग स्वतःसोबत इतरांचे जगणेदेखील सुंदर करतात. आपले जिवलग होऊन
जातात. त्यांच्या साथीने जास्त जगावेसे वाटू लागते. शांत आनंदी जगण्यासाठी आणि
कुठे फार काही आवश्यक असते?
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment