#सुधा_म्हणे: शुभं करोति कल्याणम्..
10 नोव्हेंबर 23
संध्याकाळची गोधुली वेळ. दमून भागून मंडळी घरी येतात. कुणी नोकरीवरून, कुणी दुकानातून तर मुले शाळा कॉलेजमधून. असे म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी घरी येते. घरात मग देवापुढे दिवा लावला जातो. आता घरात भरपूर उजेड असतो आपल्या तरीही देवापुढे दिवा लावला की त्याची जी आभा असते ती मनात एक पवित्र अशी शांत प्रसन्नता निर्माण करते. आपोआप हात जोडले जातात. आणि लहानपणी पाठ केलेली प्रार्थना ओठांवर येते.
“शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा..” सवयीने आपण पुढे पुढे म्हणत जातो. डोक्यातील विचार शांत शांत होत जातात. ओठ पुटपुटत असतात,
दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडले मोती
हार..
दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी..
मनातील सगळे संभ्रम कमी होत जातात. दिवसभर बाहेर जे काही वाईट अनुभवलेले असते त्यातील कष्ट, वादविवाद, कुणीतरी लागट बोलणे हे सारे बाजूला पडते. आपण त्या दिव्याच्या ज्योतीच्या लहानशा तेजाने भारून जातो. अगदी असेच वाटते लतादीदीच्या आवाजातील “दिवा पाहुनी लक्ष्मी येते.. करू तिची प्रार्थना..” हे गाणे ऐकताना.
प्रभाकर जोग यांची सहज सुंदर चाल आहे या गाण्याला. नाना म्हणजे जगदीश खेबुडकर या गीतातून मोठा आशय किती सोप्या शब्दात सांगून जातात...
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या
सेवाधर्मी
दिशादिशातून या लक्ष्मीच्या दिसती पाऊलखुणा..
लक्ष्मी प्रत्येक घरोघरी यावी, तिने सुख समृद्धी आणावी आणि मुख्यत: ही लक्ष्मी जगाच्या कल्याणासाठी कारणीभूत ठरावी ही किती निःस्वार्थी आणि पवित्र भावना. ती सारी पवित्रता लतादीदीच्या आवाजातून स्निग्धपणे स्त्रवत राहते.
या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धीचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
असे जेंव्हा नाना लिहून जातात तेंव्हा “दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो..” ही भावना मनात उमटल्याविना राहत नाही. कुणीच कुणाचा शत्रू असू नये, सर्वांच्या आयुष्यात सुख असावे ही जाणीवच किती महान आहे ना ?
आज धनत्रयोदशी. संध्याकाळी घरोघरी पूजन होईल. नवीन धान्य शेतातून तयार झालेले असेल, कित्येक घरात दागिने, नव्या वस्तू आदि रूपात लक्ष्मी येईल. ही लक्ष्मी सर्वांच्या आयुष्यात सुख घेऊन येऊ दे. याच दिवशी धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. सगळ्याना आरोग्य देणारे धन्वंतरी आपल्या आसपास असतातच. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्यच. मनातील पापवासना, हव्यास,मत्सर आदि दुर्गुण आणि आजारपण हे संपून तिथे प्रेम, करुणा, ममता, जिव्हाळा आदि भावनांची वृद्धी होऊ दे आणि सर्वांना निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करूया.
-सुधांशु नाईक(9833299791)
दिवाळीच्या शुभेच्छा !!!
ReplyDelete