marathi blog vishwa

Monday, 20 November 2023

या व्याकुळ संध्यासमयी...

#सुधा_म्हणे: या व्याकुळ संध्यासमयी..

20 नोव्हेंबर 23

कवी ग्रेस. कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे यांचे सारे जगणेच वेगळे. मराठी साहित्यविश्वातील एक गूढ व्यक्तिमत्व. लोकाना एकतर ग्रेस आवडतात किंवा आवडत नाहीत अशीच विभागणी. अनेकांच्या लेखनातून दिसणारे ग्रेस वाचत राहणे, अनुभवत राहणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. शब्द, सूर, निसर्ग, माणसे यांच्या राग-लोभात अडकलेले आणि प्रसंगी सर्वापार पोचलेले ग्रेस कुणाला संपूर्णपणे आकळणे तसे अवघडच. कधी विक्षिप्त वागणारे ग्रेस एखाद्या प्रसंगी असे मायेने वागतात यांच्या मनात नेमकी किती माणसे वस्तीला आहेत असेच वाटत राहते. ग्रेस लिहितात त्यातील आशय शोधत बसण्यापेक्षा त्यांच्या कवितेत, त्यांच्या लेखातून येणाऱ्या प्रतिमा, मानवी मनाची विविध दर्शने पाहणे फार सुखावह आहे. 

किती पैलू असतात ना मानवी मनाला? त्यांच्या कवितेवर संध्याकाळ जणू  गारुड घालत राहते. कुठूनतरी तो संध्याकाळचा गहिरेपणा, ते गूढ धूसर आणि विविधरंगी आकाश त्यांना भुरळ घालते. त्यांच्या शब्दातून जीवंत होणारी संध्याकाळ मग आपल्याला मोहवत राहते. ती कधी अपार प्रेमाने आपल्या  घट्ट कुशीत येते तर कधी विरहवेदनेने जिवाची तगमग करायला लावते. अशा संधिकाली आपणदेखील मग सगळे सगळे विसरून जातो. त्या कवितेचे होऊन जातो. आता हीच कविता पहा ना;

त्या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो,

डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे, मी अपुले हात उजळतो

तू आठवणींतुन माझ्या कधी रंगीत वाट पसरशी,

अंधार-व्रताची समई, कधी असते माझ्यापाशी..

 

पदराला बांधुन स्वप्‍ने, तू एकट संध्यासमयी,

तुकयाच्या हातांमधला, मी अभंग उचलुन घेई..

तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा,

संन्यस्त सुखाच्या काठी, वळिवाचा पाऊस यावा..

असे जीवघेणे लिहून गेल्यावर आपल्या हाती काय उरते ? 

नरेंद्र भिडे यांनी या कवितेला सुरेख स्वर दिले आणि हृषीकेश रानडेच्या सुरेख आवाजात ही कविता मनात खोल खोल उतरत जाते. आपल्या जिवलगासोबत बसून एखाद्या संधिकाली अशा कविता वाचत बसणे, ऐकत बसणे यातले सुख कोणत्या शब्दात सांगता येईल? ते सारेच शब्दांच्या पलिकडले !

 -सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment