marathi blog vishwa

Saturday, 11 November 2023

मन सुद्ध तुझं...

 #सुधा_म्हणे: मन सुद्ध तुझं...

11 नोव्हेंबर 23 

मन. अथांग असे आपलेच हे मन. प्रत्येक माणूस किती वेगळा विचार करतो ना. आपल्या स्वतःसाठी आणि इतरांसाठी काही ना काही करत राहतो. कधी चुकतो, कधी योग्य वागतो कधी गोंधळून जातो तर कधी निराश होतो. आपण योग्य ते सारे करत असूनही वाटेत अडचणी आल्यावर, अकारण कुणी आपल्याला बोल लावले की त्याचे मन उद्विग्न होऊन जाते. कशासाठी,कुणासाठी आपण इतके कष्ट करायचे असे वाटते. त्यावेळीच कानावर बोल पडतात,

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची

तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची..

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला

काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला

रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची.. 


गीतकार शांताराम आठवले ग्रामीण मराठी बोलीचा आधार घेत, मानसशास्त्रातील संकल्पना किती सहज सोप्या तऱ्हेने आपल्याला सांगून जातात ना.! जेंव्हा आपण काही वेगळे करायला जातो तेंव्हा रस्ता सहजसोपा नसतोच. त्यातही जे सामान्य लोक चाकोरीबद्ध वाटेने जगत असतात त्यांना आपले वेगळी वाट पकडून असे चालणे रुचत नाही. तेही आपल्याला त्रास देत राहतात. कधी टोमणे मारतात तर कधी मुद्दाम अडचणी निर्माण करतात. आपण जे भले काम करतो आहो त्याबद्दल आपले मन खंबीर असेल, आपल्या मनी दृढविश्वास असेल तर मग कशाला कुणाला घाबरावे आपण? 

आयुष्य ही कायमच एक लढाई असते. इथे सगळ्या गोष्टी सहजसोप्या नसतातच. आणि लढाईत उतरायचे तर सगळ्याप्रकारे आपली तयारी हवीच ना? दोन घाव द्यावे लागतात, दोन अंगावर झेलावे लागतात.

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई

अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई

गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची.. 

जी माणसे आज आपल्याला मोठी झालेली दिसतात त्यांनी अशाच अनेक लढाया लढल्या आहेत. या जगात कोणालाच कोणतीही गोष्ट सहजा सहजी मिळत नाही. त्यासाठी झगडावे लागते, झुंजायला हवेच. आज आपण काहीतरी सोसतोय, उद्या त्यामुळे आपल्यालादेखील यश मिळणारच आहे यावर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. जेंव्हा आपण असे खंबीरपणे मार्गक्रमण करतो तेंव्हा विजयश्री निश्चित लाभतेच. 1937-38 मध्ये कुंकू चित्रपटासाठी लिहिलेले हे गीत आजही किती स्फूर्तिदायक आहे ना?

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment