marathi blog vishwa

Thursday 30 November 2023

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा…

#सुधा_म्हणे: हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा

30 नोव्हेंबर 23 

मंडळी नुकताच क्रिकेट विश्वकप सर्वानी पाहिला आणि अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे अनेकांनी अनेक प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या. कित्येकांनी मोठमोठे लेख लिहिले. काय चुकलं, काय बरोबर याबाबत अनेक मत-मतांतरे व्यक्त झाली. ज्यांनी आयुष्यात क्रिकेटची बॅट किंवा बॉल हाती घेतला सुद्धा नाहीये त्यांना व्यक्त होताना पाहून मजा वाटते. क्रिकेट हा खेळ आपल्या देशाच्या काना कोपऱ्यात असा काही रंगलाय की कुठेही या विषयावर आपण बोलू शकतो. 

मग मला लहानपण आठवते. दिवसा-रात्री खेळलेले आठवते आणि मग आठवते ते गाणे सुनील गावस्कर यांच्या आवाजातले. रेडिओवर खूप वेळा लागायचे. साधे असे छान गाणे इतकेच वाटायचे त्याकाळी. पण ते फक्त गाणे नव्हते तर जीवनाचे जणू तत्वज्ञान होते असे आता जाणवते.!

या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला ?

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !

क्रिकेटच कशाला रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण जोवर चालत असतो, कार्यरत असतो तोवरच आपली किंमत असते ना. जो एकदा बाजूला फेकला जातो तो मग विस्मरणात जातो. फार मोठे मोठे राजे इथे होऊन गेले, फार मोठे अभिनेते, गायक-वादक-चित्रकार आदि कलाकार, खेळाडू इथे हजारो वर्षात होऊन गेले पण जे थांबले ते बाजूला पडले संपले हेच तर सत्य. गाण्यातील पुढील ओळी पहा ना;

अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी

डाव तुझा येतांच तू जमविशी आपुली खेळी

मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव

ह्या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुजला धाव

चतुर आणि सावध जो जो,तोच इथे रंगला

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला !

आयुष्याच्या मैदानात आपण उतरतो ते पण अगदी असेच असतं ना ? कामे सुरू करण्यापूर्वी किती अभ्यास करतो, भरपूर प्रकारचे सल्ले घेतो, किती प्रकारचे नियोजन करतो. किती प्रकारची मेहनत करतो.. मात्र जेंव्हा प्रत्यक्ष काम सुरू करतो तेंव्हा आपले कौशल्य पणाला लागते. नियती असो, प्रतिस्पर्धी असो किंवा आपली कमतरता असो हे सगळे यष्टीरक्षक आपला डाव उधळून टाकण्यासाठी अगदी सज्जच असतात. आपण नीट लक्षपूर्वक खेळत राहिलो, आत्मविश्वास आणि अभ्यास यांची सांगड घालून जगत राहिलो तर शक्यतो अपयश येत नाही. एखाद्या क्षणी, एखाद्या डावात हरलो तरी पुन्हा उभे राहण्याची जिद्द अंगी असतेच. ज्याना हे जमते ते यशस्वी होतातच.

या गाण्याचे संगीत देताना, मागे टपला यष्टीरक्षक.. या ओळीनंतर “म्याव म्याव.. म्याव..” असे काहीसे पार्श्वसंगीत होते. लहानपणी रेडिओवर हे गाणे कायम लागायचे आणि त्या संगीताच्या तुकड्यासकट गाणे म्हणणे फार छान वाटायचे. 

सुनील गावस्कर हे त्यावेळी क्रिकेट खेळणाऱ्या आम्हा सगळ्या मुलांसाठी कायमच आदर्श होते. त्यांच्या खेळाची कॉमेंटरी ऐकणे, सनी डेज, आय डॉल्स सारखी त्यांची पुस्तके वाचणे हे फार आवडायचे त्यावेळी. त्यामुळे आपल्या आवडत्या गावस्करचे गाणे लागले की 5 मिनिटे आम्ही ऐकत उभे राहायचो. 

एखादी खेळी असो की वैयक्तिक आयुष्यातील सुखाचे क्षण .. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे जे योजले ते ते घडवून दाखवले. अत्यंत दृढ आत्मविश्वास असला की खेळ असो वा आपले जीवन सगळे काही आपण नक्कीच घडवू शकतो हे त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या इनिंगमधून आजवर दाखवून दिले आहे. अगदी असेच प्रत्येकाच्या आयुष्यात हवी तशी इनिंग त्यांना खेळता यायला हवी. ज्याना अशी इनिंग खेळता येते त्यांचे जीवन सुखाचे होऊन जाते. आपल्याला तरी दुसरे आणि काय हवे असते ?

-सुधांशु नाईक(9833299791)

No comments:

Post a Comment