#सुधा_म्हणे: वाटेवर काटे वेचीत चाललो..
17 नोव्हेंबर 23
वाट. आपल्याला कुठून कुठेतरी घेऊन जाणारी. कधी त्यावर सुखाचे थांबे तर कधी दुःखाचे. कधी कंटाळवाणी वाटणारी वाट तर उत्साहाच्या भरात कधी पटकन संपून गेलेली वाट. एखाद्या नकोशा कामासाठी जेंव्हा जायचे असते तेंव्हा त्या वाटेवरील लहानशी टेकडी किंवा चढावाचा रास्ता हा उंच पर्वतापरी भासू लागतो. मात्र जेंव्हा आपल्या ध्येयासाठी, आपण ज्याची अधीरतेने वाट पाहतो अशा उद्दिष्टासाठी आपण एखाद्या मार्गावर चालू लागतो तेंव्हा त्यातले सारे अडथळे खूपच छोटे वाटू लागतात.
कवी अनिल
उर्फ आत्माराम रावजी देशपांडे हीच भावना आपल्या कवितेतून मांडताना म्हणतात;
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो
पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात ही कविता ऐकणे एक सुंदर अनुभव असतो. संगीतकार यशवंत देव यांचे तर शब्दप्रधान गायकीवर अफाट प्रभुत्व. त्यामुळे त्यांची स्वर रचना वसंतरावांच्या धारधार आवाजात ऐकणे म्हणजे जणू दुधात साखरच. माणसे म्हटले तर ऐन गर्दीत देखील एकटी एकटी असतात कधी स्वतःशीच बोलत जाणारी तर कधी शांत स्तब्ध अशी. आपलीच सोबत करणाऱ्या अशांसाठी चपखल लिहिताना कवी अनिल म्हणतात,
मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो...
आयुष्यात अनेक वाटांवर आपण चालताना कितीदा मार्ग चुकतो, कितीदा आपण चुकीचे पाऊल उचलतो. जरा पुढे गेल्यावर मग आपल्या चुका सुधारत बसतो. हे जसे प्रवासासाठी असते तसेच जगण्यासाठी देखील. आपण चुकलो हे देखील उमगले पाहिजे मगच चूक दुरुस्त करता येते. पुन्हा तोल सावरताना मग आपण स्वतःशीच गुणगुणू लागतो,
चुकली तालात चाल, लागला जीवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो...
मागच्या एका लेखात म्हटले होते त्यानुसार प्रत्येक क्षण आपण सुखाचा शोध घेत असतो. एका सुखासाठी डोंगरभर दुःखे पार करत राहतो. कधीतरी या सगळ्यातून पार असे दूरच्या वाटेवर जावेसे वाटते, दैनंदिन जीवनाच्या, इथल्या बंधनांच्या चौकटीतून मुक्त होऊन नव्या वाटेवर चालत जावेसे वाटते. ती वाट वेगळीच. तिथे स्वतःहून जावेसे वाटणारी माणसे मोजकीच असतात आणि कदाचित जास्त समंजस.
खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकून देऊन अता परत चाललो..
आशा, अपेक्षा, कर्तव्ये, जबाबदारी, इतरांच्या मागण्या अशी एकापेक्षा एक लहान मोठी ओझी. लहानपणापासून तना-मनावर लादलेली. जेंव्हा आयुष्यभर पेललेली ओझी उतरवून आपण चालू लागतो त्यावेळची मनस्थिती किती वेगळी ना? एकदा ओझे झुगारून दिले की मग चालताना जाणवते अरे हे तर खूप सोपे आहे. का आपण इतकी वर्षे ही सगळी ओझी बाळगत होतो ? आणि त्यानंतरचा प्रवास मग आनंदयात्रा बनून जातो. आपणच आपले जिवलग बनून जातो..!
-सुधांशु नाईक(9833299791)
No comments:
Post a Comment